RSS शी सबंधित प्रल्हाद जोशी कोण आहेत? प्रधानांनंतर मिळाली शिक्षण मंत्रालयाची जबाबदारी

फोटो स्रोत, AFP via Getty Images
धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी (25 जुलै) केंद्रीय शिक्षणमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर, दिल्लीतील जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीच्या (सीजेपी) नेतृत्वात सुरू असलेलं आंदोलन संपुष्टात आलं आहे.
जंतर मंतरवर रविवारी (26 जुलै) सकाळीही पोलीस तैनात होते आणि बॅरिकेड्स लावण्यात आले होते. पण आंदोलक आपापल्या घरी परतल्यामुळे पोलिसांची संख्या पूर्वीपेक्षा खूपच कमी होती.
राष्ट्रपती भवनाननं जारी केलेल्या निवेदनात पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला असून, प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार सोपवण्यात आल्याचं म्हटलं आहे.
प्रल्हाद जोशींकडं सध्या ग्राहक, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालयाचा कारभार असून नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचा कार्यभारही आहे.
सीजेपीचे प्रवक्ते सौरभ दास शनिवारी (25 जुलै) प्रतिक्रिया देताना म्हणाले होते की, "जो कोणी पुढचा शिक्षणमंत्री होईल, त्याला हे माहिती आहे की तरुण पिढी त्यांच्याकडे डोळे लावून बसली आहे. वेळ आल्यावर ते उत्तरं मागतील. त्यामुळं चांगलं आणि तरुणांच्या हिताचं काम करा. पेपरफुटी थांबवा आणि आमच्या पाच सूचनांची अंमलबजावणी करा."
सरकारनं एका महिन्याच्या आत नवीन शिक्षणमंत्र्यांबरोबर भेट होईल, असं आश्वासन दिलं असल्याचंही त्यांनी सांगितलं.
धर्मेंद्र प्रधानांबद्दल काय म्हणाले प्रल्हाद जोशी?
शनिवारी (25 जुलै) नवीन जबाबदारी स्वीकारल्यानंतर जोशी म्हणाले की, "पंतप्रधानांनी मला ही जबाबदारी दिली आहे. मी ती कर्तव्यभावनेने आणि नम्रतेने स्वीकारतो आणि पंतप्रधानांचे आभार मानतो."
"मोदी सरकारच्या गेल्या 12 वर्षांत अनेक ऐतिहासिक कामं झाली आहेत. मी पंतप्रधानांच्या मार्गदर्शनाखाली माझ्या क्षमतेनुसार सर्वोत्तम काम करण्याचा प्रयत्न करेन."
प्रल्हाद जोशी यांनी त्यांच्या एक्स हँडलवरील एका पोस्टमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळाचा उल्लेखही केला.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
"धर्मेंद्र प्रधान यांचा राजकीय प्रवास अनेक दशकांचा आहे. देशाच्या विकासाप्रती असलेली त्यांची वचनबद्धता नेहमीच स्मरणात राहील. त्यांच्या (धर्मेंद्र प्रधान) कार्यकाळात, नवीन शिक्षण धोरण (एनईपी) 2020 यशस्वीरित्या राबविण्यात आले. यासोबतच, शिक्षण क्षेत्रात 100 हून अधिक लहान-मोठ्या सुधारणा करण्यात आल्या," असं जोशी म्हणाले.
"राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देऊन प्रधान यांनी राजीनामा देण्याचा घेतलेला निर्णय, देशाच्या विकासातील त्यांच्या योगदानाला कोणत्याही प्रकारे रोखू शकत नाही. राष्ट्रीय विकासाच्या मार्गावर आपण पुन्हा भेटू."
कोण आहेत प्रल्हाद जोशी?
संसदेच्या वेबसाइटनुसार, प्रल्हाद व्यंकटेश जोशी हे कर्नाटकातील भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि धारवाड लोकसभा मतदारसंघाचे सलग सहा वेळा निवडून आलेले खासदार आहेत.
त्यांचा जन्म 27 नोव्हेंबर 1962 रोजी कर्नाटकातील विजयपुरामध्ये झाला. 2004 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून आले आणि तेव्हापासून ते सातत्याने धारवाडचे प्रतिनिधित्व करत आहेत.
कर्नाटकातील भाजपच्या संघटनेतील प्रमुख नेत्यांपैकी एक मानले जाणारे जोशी 2014 ते 2016 या काळात पक्षाचे प्रदेशाध्यक्षही होते. त्याशिवाय 2014 ते 2018 या वर्षांदरम्यान ते लोकसभेच्या अध्यक्षमंडळाचे सदस्यही होते.
सध्या प्रल्हाद जोशी यांच्याकडे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाच्या जबाबदारीसोबतच शिक्षण मंत्रालय, ग्राहक, अन्न आणि पुरवठा मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभारही आहे.
2019 ते 2024 दरम्यान त्यांनी संसदीय कामकाज, कोळसा आणि खाणकाम मंत्रालयाची जबाबदारीही सांभाळली.
जोशी यांचं सुरुवातीचं शिक्षण कर्नाटकातील हुबळीतील रेल्वे स्कूल आणि न्यू इंग्लिश स्कूलमधून झालं. त्यानंतर त्यांनी हुबळी येथील श्री काडसीडेश्वर कला महाविद्यालयातून बी.ए.चं शिक्षण घेतलं.

फोटो स्रोत, AFP via Getty Images
सक्रिय राजकारणात प्रवेश करण्यापूर्वी ते उद्योगक्षेत्रात कार्यरत होते. त्यांचा पेशा 'उद्योजक' असा नोंदवला आहे.
इकॉनॉमिक टाइम्सच्या वृत्तानुसार , तरुणपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी (आरएसएस) संबंधित असलेले प्रल्हाद जोशी, 1992 ते 1994 दरम्यान हुबळी येथील ईदगाह मैदानावर झालेल्या आंदोलनात पहिल्यांदा प्रकाशझोतात आले.
या आंदोलनात, वादग्रस्त जागेवर तिरंगा फडकवण्याची परवानगी मागण्यात आली. संसदेच्या वेबसाइटनुसार, ते 1998 ते 2003 दरम्यान भाजपचे धारवाड जिल्हाध्यक्ष होते.
2004 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे बी.एस.पाटील यांचा पराभव करून ते पहिल्यांदा संसदेत पोहोचले.
त्यानंतर त्यांनी 2009, 2014, 2019, आणि 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये धारवाडची जागा कायम राखली आणि ते कर्नाटकातील सर्वाधिक काळ सेवा देणाऱ्या भाजप खासदारांपैकी एक बनले.
जोशींवर किती जबाबदारी आहे?

फोटो स्रोत, Ajay Aggarwal/Hindustan Times via Getty Images
अलीकडील मंत्रिमंडळातील फेरबदलानंतर, प्रल्हाद जोशी यांच्याकडे आता इतर काही महत्त्वाच्या मंत्रालयांची जबाबदारी आहे:
१. शिक्षण मंत्री (अतिरिक्त कार्यभार)
२. ग्राहक, अन्न आणि पुरवठा मंत्रालय
३. नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय
2019 ते 2024 दरम्यान त्यांच्याकडे संसदीय कामकाज मंत्रालय, कोळसा मंत्रालय आणि खाण मंत्रालय यांचीही जबाबदारी होती.
यापूर्वी, 2014 ते 2019 या काळात ते अनेक संसदीय समित्यांचे सदस्य आणि अध्यक्ष होते, विशेषतः पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू विषयक स्थायी समितीचे अध्यक्ष होते.
प्रल्हाद जोशी आणि त्यांच्या पत्नीची मालमत्ता किती आहे?
2024 च्या सार्वत्रिक निवडणुकांदरम्यान निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार , प्रल्हाद जोशी यांच्याकडे वाहनं, दागिने, बँका आणि शेअर बाजारातील गुंतवणूक, कंपन्या आणि वित्तीय संस्थांमधील गुंतवणूक आणि विमा पॉलिसींच्या स्वरूपात 2 कोटी 72 लाख 45 हजार 965 रुपयांची जंगम मालमत्ता आहे.
बंगळुरूमध्ये त्यांच्या मालकीचा एक मोकळा भूखंड आहे, त्याचे सध्याचे मूल्य 2 कोटी 60 लाख 07 हजार 300 रुपये आहे.
तसेच, बंगळुरूमध्ये त्यांच्या मालकीचं एक निवासी अपार्टमेंट आहे, त्याची किंमत 3 कोटी 19 लाख 64 हजार 625 रुपये इतकी आहे.

फोटो स्रोत, Sonu Mehta/Hindustan Times via Getty Images
हुबळीमध्ये त्यांचं एक निवासी घरही आहे, ज्याची किंमत 2 कोटी 80 लाख 18 हजार 200 रुपये आहे.
हुबळीमध्येच गोविंद जोशी यांच्यासोबत त्यांची सुमारे 30 हजार चौरस फुटांच्या एका मोकळ्या भूखंडावर संयुक्त मालकी आहे, ज्याची किंमत 2 कोटी 64 लाख 93 हजार 360 रुपये आहे.
प्रल्हाद जोशी यांच्यावर बँका आणि सरकारचे 6 कोटी 63 लाख 77 हजार 239 रुपयांचे देणे आहे.
त्यांच्या पत्नी ज्योती प्रल्हाद जोशी यांच्याकडे 86 लाख 39 हजार 480 रुपये किमतीची जंगम मालमत्ता आणि 5 कोटी 93 लाख 88 हजार 547 रुपये किमतीची स्थावर मालमत्ता आहे.
त्यांच्यावर सार्वजनिक वित्तीय संस्था, केंद्र सरकार आणि राज्य सरकारांचे 1 कोटी 37 लाख 46 हजार रुपयांचे कर्ज आहे.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)

























