IVF मुळे जुळी किंवा तिळी मुलंच जन्माला येतात का? जाणून घ्या IVF बद्दल सर्वकाही

  • Published
  • वाचन वेळ: 9 मिनिटे

(25 जुलै हा वर्ल्ड IVF दिन म्हणून साजरा केला जातो.)

आई-वडील होण्याचं स्वप्न अनेक जोडपी पाहतात. मात्र काहींसाठी गर्भधारणा होणं अपेक्षेपेक्षा अधिक कठीण ठरतं. जागतिक स्तरावर वंध्यत्व (Infertility) ही एक महत्त्वाची आरोग्य समस्या मानली जाते आणि अशावेळी अनेक जोडप्यांसाठी इन विट्रो फर्टिलायझेशन (IVF) हा आशेचा किरण ठरतो.

IVF म्हणजे स्त्रीच्या शरीरातून स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू प्रयोगशाळेत एकत्र करून भ्रूण तयार करणे आणि तो नंतर गर्भाशयात प्रत्यारोपित करणे. आज IVF केवळ एक वैद्यकीय उपचार नसून विज्ञान, तंत्रज्ञान आणि भावनिक गोष्टींची इथं सांगड घातली जाते.

पण आपल्याकडे आयव्हीएफबद्दल अनेक प्रश्न आणि गैरसमज आहेत. आयव्हीएफ केल्यावर हमखास जुळं किंवा तिळं होतात का? वय, लठ्ठपणा, धूम्रपान किंवा तणाव याचा आयव्हीएफ च्या यशावर किती परिणाम होतो? पुरुषांची प्रजननक्षमताही तितकीच महत्त्वाची असते का? एका आयव्हीएफ सायकलचा खर्च किती असतो आणि यशाची शक्यता नेमकी किती असते?

अशा अनेक प्रश्नांची उत्तरं शोधताना हे लक्षात येतं की आयव्हीएफ हा 'शॉर्टकट' नसून काळजीपूर्वक नियोजन, वैद्यकीय तपासण्या आणि मानसिक तयारीची गरज असलेला तो एक मार्ग आहे.

आधुनिक तंत्रज्ञानामुळे त्याच्या यशाचा दर वाढत असला तरी प्रत्येक जोडप्याचा अनुभव वेगळा असू शकतो.

मूल होण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या सामान्य लोकांच्या मनात असणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरं मिळवण्याचा प्रयत्न आपण इथं करणार आहोत.

शास्त्र, संयम आणि वस्तुस्थिती

आयव्हीएफ उपचाराचा विचार करण्यापूर्वी वंध्यत्वाची कारणं समजून घेणं महत्त्वाचं असतं.

काही जोडप्यांमध्ये स्त्रीच्या फलोपियन ट्यूब्समधील समस्या, एंडोमेट्रिओसिस किंवा वाढतं वय कारणीभूत असू शकतं, तर काही प्रकरणांमध्ये कमी शुक्राणू संख्या, त्यांची हालचाल किंवा गुणवत्ता यांसारखे पुरुषांशी संबंधित घटक आढळतात.

त्यामुळे आयव्हीएफ हा केवळ स्त्रीवरती केला जाणारा उपचार नसून ती दोन्ही जोडीदारांच्या आरोग्याशी संबंधित प्रक्रिया आहे. तज्ज्ञांच्या मते, अनेकदा पुरुषांची तपासणी उशिरा होते, ज्यामुळे उपचाराचा कालावधी आणि खर्च वाढू शकतो.

आयव्हीएफ बद्दलचे समज आणि वास्तव यांमधला फरक समजून घेणं हे उपचार सुरू करण्याइतकंच महत्त्वाचं आहे.

आयव्हीएफ म्हणजे नेमकं काय आणि ते नैसर्गिक गर्भधारणेपेक्षा कसं वेगळं आहे?

नैसर्गिक गर्भधारणेत स्त्रीबीज आणि शुक्राणू यांचा संयोग स्त्रीच्या शरीरात, सहसा फलोपियन ट्यूबमध्ये होतो.

IVF (इन व्हिट्रो फर्टिलायझेशन) मध्ये हा संयोग शरीराच्या बाहेर म्हणजेच प्रयोगशाळेत घडवला जातो.

स्त्रीच्या अंडाशयातून स्त्रीबीज गोळा केली जातात, ती नियंत्रित प्रयोगशाळेतील वातावरणात शुक्राणूंशी एकत्र आणली जातात आणि तयार झालेला भ्रूण काही दिवस विकसित झाल्यानंतर गर्भाशयात ठेवला जातो.

साधारणपणे 12 महिने (महिलेचे वय 35 वर्षांपेक्षा जास्त असल्यास 6 महिने) प्रयत्न करूनही नैसर्गिकरित्या गर्भधारणा होत नसेल किंवा फलोपियन ट्यूब बंद असणं, पुरुषांमध्ये गंभीर पातळीवरचं वंध्यत्व असेल किंवा वंध्यत्वाचं कारण अस्पष्ट असेल किंवा इतर सोपे उपचार निष्फळ ठरल्यास IVF चा मार्ग सुचवला जातो.

कोणत्या कारणांमुळे जोडप्यांना IVF ची गरज भासते?

हा एक नेहमी विचारला जाणारा प्रश्न आहे. डॉ. प्रशांत भामरे यांनी बीबीसी मराठीच्या प्रश्नांना सविस्तर उत्तरं दिली. ते नवी मुंबईतल्या वाशीमधील फोर्टिस हिरानंदानी हॉस्पिटल येथे प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाचे प्रमुख आणि संचालक आहेत.

आयव्हीएफमध्ये सुमारे एक-तृतीयांश प्रकरणे महिलांशी संबंधित कारणांमुळे, एक-तृतीयांश पुरुषांशी संबंधित कारणांमुळे, तर उर्वरित दोघांतील समस्या किंवा अस्पष्ट कारणांमुळे असतात, असं डॉ. भामरे सांगतात.

आयव्हीएफची गरज का भासते याबद्दल त्यांनी पुढील कारणं सांगितली,

  • फलोपियन ट्यूब बंद किंवा खराब होणे (पूर्वीचा संसर्ग किंवा शस्त्रक्रिया)
  • PCOS सारखे अंडोत्सर्जनाचे विकार
  • एंडोमेट्रिओसिस
  • वाढत्या वयानुसार स्त्रीबीजांची गुणवत्ता किंवा संख्या कमी होणे
  • शुक्राणूंची संख्या कमी असणे किंवा त्यांची हालचाल कमी असणे
  • फायब्रॉइड्स किंवा पॉलिप्ससारख्या गर्भाशयातील समस्या
  • सर्व तपासण्या करूनही स्पष्ट कारण न सापडणारे वंध्यत्व

आयव्हीएफ प्रक्रिया कशी असते?

टप्पा 1 – अंडाशयाला उत्तेजना देणे (Ovarian Stimulation):

सुमारे 8 ते 12 दिवस दररोज हार्मोनची इंजेक्शन्स दिली जातात, ज्यामुळे एका चक्रात नेहमीप्रमाणे एकाऐवजी अनेक स्त्रीबीजं तयार होतात. अल्ट्रासाऊंड आणि रक्त तपासण्यांद्वारे त्यांची वाढ तपासली जाते.

टप्पा 2 – स्त्रीबीज काढणे (Egg Retrieval):

फॉलिकल्स परिपक्व झाल्यानंतर 'ट्रिगर' इंजेक्शन दिले जाते. त्यानंतर सुमारे 36 तासांनी अल्ट्रासाऊंडच्या मदतीने आणि सौम्य भूल देऊन स्त्रीबीज गोळा केली जातात. ही एक छोटी डे-केअर प्रक्रिया असते.

टप्पा 3 – फलन (Fertilization):

प्रयोगशाळेत स्त्रीबीज आणि शुक्राणू एकत्र केले जातात. शुक्राणूंच्या गुणवत्तेनुसार पारंपरिक IVF किंवा ICSI (एका स्त्रीबीजात एकच शुक्राणू इंजेक्ट करणे) पद्धत वापरली जाते.

टप्पा 4 – भ्रूणाची वाढ (Embryo Culture):

फलित झालेल्या स्त्रीबीजांना 3 ते 5 दिवस प्रयोगशाळेत वाढवले जाते आणि त्यांचा विकास काळजीपूर्वक पाहिला जातो.

टप्पा 5 – भ्रूण हस्तांतरण (Embryo Transfer):

एक भ्रूण (कधीकधी दोन, वैद्यकीय गरजेनुसार) पातळ कॅथेटरच्या मदतीने गर्भाशयात ठेवला जातो. ही प्रक्रिया जलद आणि साधारणपणे वेदनारहित असते.

टप्पा 6 – गर्भधारणा चाचणी (Pregnancy Test):

भ्रूण हस्तांतरणानंतर सुमारे दोन आठवड्यांनी रक्त चाचणी करून गर्भधारणा झाली आहे की नाही हे तपासले जाते.

आयव्हीएफमुळे महिलेला किंवा बाळाला काही धोका किंवा त्यावर दुष्परिणाम होतात का?

याचं उत्तर देताना डॉ. प्रशांत भामरे म्हणाले, "महिलांना यावेळेस हार्मोन उपचारादरम्यान पोट फुगल्यासारखे वाटणे, मूडमध्ये बदल होणे किंवा इंजेक्शन दिलेल्या जागी त्रास होणे हे सामान्यपणे आणि तात्पुरते होऊ शकते. काही महिलांमध्ये Ovarian Hyperstimulation Syndrome (OHSS) होऊ शकतो, मात्र त्यावर लक्ष ठेवून उपचार केले जातात."

डॉ. भामरे पुढं सांगतात, " बाळाच्या बाबतीत बोलायचं झालं तर आजवर झालेल्या मोठ्या संशोधनांनुसार, आयव्हीएफद्वारे जन्मलेली बहुतेक बाळं निरोगी असतात. तथापि, नैसर्गिक गर्भधारणेच्या तुलनेत अकाली जन्म किंवा जन्मावेळी कमी वजन असण्याचा धोका किंचित वाढलेला दिसतो. हा धोका प्रामुख्याने मूळ वंध्यत्वाच्या कारणांशी आणि एकाधिक गर्भधारणेशी संबंधित असतो, IVF प्रक्रियेशी नाही. त्याची उपचार सुरू करण्यापूर्वी जोडप्यांना माहिती दिली जाते."

आयव्हीएफचे यशाचे प्रमाण किती असते?

आयव्हीएफचे यशाचे प्रमाण व्यक्तीनुसार बदलते. सर्वांसाठी लागू होईल असा एकच आकडा सांगता येत नाही, असं डॉ. प्रशांत भामरे सांगतात

यशावर परिणाम करणारे प्रमुख घटक:

  • महिलेचे वय (सर्वात महत्त्वाचा घटक; 35 नंतर आणि विशेषतः 40 नंतर यशाचे प्रमाण घटते)
  • अंडाशयाची क्षमता
  • शुक्राणूंची गुणवत्ता
  • गर्भाशय आणि हार्मोन्सचे आरोग्य
  • भ्रूणाची गुणवत्ता
  • वंध्यत्वाचे मूळ कारण

गर्भधारणा उशिरा केल्यास IVF ची गरज भासण्याची शक्यता वाढते का?

वय वाढल्यामुळे प्रजननक्षमतेसंबंधी उपचारांची गरज भासण्याची शक्यता वाढू लागते. पण ते इतकं सोपं उत्तर नाही.

आज अनेक लोकांचं पालक होण्याचं वय मागील पिढ्यांच्या तुलनेत पुढे सरकलं आहे. शिक्षणासाठी वेळ लागतो. करिअरसाठी वेळ लागतो, योग्य जोडीदार शोधण्यासाठी वेळ लागतो.

यासाठी आर्थिक आणि भावनिक तयारीही महत्त्वाची असते आणि मग, अनेकदा वयाच्या तिशीच्या मध्यावर एक नवीन चिंता डोकावू लागते "मी खूप उशीर तर केला नाही ना? आता मला आयव्हीएफची गरज पडेल का?"

मुंबईतील जसलोक हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर येथे असिस्टेड रिप्रॉडक्शन अँड जसलोक फर्टाइलट्री विभागाच्या संचालक डॉ.फिरुझा पारिख याचं उत्तर देतात.

डॉ. पारिख सांगतात, "या प्रश्नाचं थोडक्यात उत्तर म्हणजे, गर्भधारणा उशिरा केल्यास वंध्यत्वावरील उपचारांची, त्यातही आयव्हीएफची, गरज भासण्याची शक्यता वाढू शकते. पण वय 35 झालं की प्रजननक्षमता अचानक बंद होते, असं नाही. हा बदल हळूहळू होतो, प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळा असतो आणि संपूर्ण प्रजननक्षमतेच्या स्थितीचा तो फक्त एक भाग आहे."

डॉ. पारिख पुढं सांगतात, "साधारणपणे प्रजननक्षमता तिशीच्या सुरुवातीला कमी होण्यास सुरुवात होते, तिशीच्या मध्यावर (सुमारे 34 वर्षांच्या आसपास) हा बदल अधिक जाणवू लागतो आणि 40 वर्षांनंतर ती अधिक वेगानं घटते. पण चौतीसावं वर्षं हे एखाद्या कड्यावरून खाली पडावं असं काही वळण नाही. एक निरोगी 36 वर्षीय स्त्री काही महिन्यांत नैसर्गिकरीत्या गर्भवती होऊ शकते, तर त्यापेक्षा कमी वयाच्या स्त्रीला फलोपियन ट्यूब बंद असणे, एंडोमेट्रिओसिस, अंडोत्सर्जनाच्या समस्या किंवा पुरुष घटकांशी संबंधित कारणांमुळे अडचणी येऊ शकतात.

गर्भधारणेदरम्यानही वय महत्त्वाचं ठरतं. आईचं वय वाढल्यावर उच्च रक्तदाब, गर्भावस्थेतील मधुमेह आणि काही इतर गुंतागुंत होण्याचा धोका वाढतो. याचा अर्थ निरोगी गर्भधारणा अशक्य आहे असा नाही; तर गर्भधारणेपूर्व नियोजन आणि योग्य गर्भसंवर्धन (antenatal care) अधिक महत्त्वाचं ठरतं.

उशिरा गर्भधारणा म्हणजे आयव्हीएफची गरज लागणारच का? असा प्रश्न विचारल्यावर डॉ. फिरुझा पारिख म्हणाल्या, "नाही. गर्भधारणा उशिरा करणाऱ्या अनेक महिलांना नैसर्गिकरीत्या गर्भधारणा होते आणि त्यांना कधीही IVFची गरज पडत नाही. काहींना केवळ शरीरसंबंधांची योग्य वेळ ठरवणे, थायरॉईड किंवा अंडोत्सर्जनाशी संबंधित समस्यांवर उपचार करणे किंवा निवडक प्रकरणांमध्ये इंट्रायुटेराईन इन्सेमिनेशन (IUI) यासारख्या साध्या मदतीची आवश्यकता असू शकते."

"आयव्हीएफचा सल्ला तेव्हाच दिला जातो जेव्हा तो एखाद्या विशिष्ट समस्येवर उपाय ठरतो किंवा इतर सोप्या उपचारांनी यश मिळण्याची शक्यता खूप कमी असते."

बीबीसी मराठीशी बोलताना डॉ. पारिख यांनी एक महत्त्वाचं वाक्य सांगितलं. त्या म्हणतात, "IVF प्रभावी आहे, पण ते 'टाइम मशीन' नाही."

"गरज पडली तर नंतर आयव्हीएफ करू; त्यामुळे गर्भधारणा कितीही पुढे ढकलली तरी चालेल."

"IVFमुळे प्रजनन वैद्यकशास्त्रात क्रांती झाली असली तरी त्याचं यश अजूनही मोठ्या प्रमाणावर स्त्रीबीजाचं वय आणि गुणवत्ता यावर अवलंबून असतं," असं डॉ. पारिख सांगतात.

वय वाढल्यावर स्त्रीबीजं कमी मिळू शकतात, त्यापैकी कमी स्त्रीबीजांचं यशस्वी फलन होऊ शकतं, वापरण्यायोग्य भ्रूणही कमी बनू शकतात आणि गुणसूत्रीय दोषांचं प्रमाण जास्त असू शकतं.

त्यामुळे काही रुग्णांना एकापेक्षा जास्त आयव्हीएफ सायकलची गरज पडू शकते आणि काहींना अखेरीस स्त्रीबीज दात्यांचा (donor eggs) विचार करावा लागू शकतो.

वंध्यत्व ही केवळ महिलांची समस्या आहे, हा देखील एक मोठा गैरसमज आहे. प्रत्यक्षात अनेक प्रकरणांमध्ये पुरुषांशी संबंधित कारणेही तितकीच जबाबदार असतात. त्यामुळे प्रजननक्षमतेचे मूल्यमापन करताना दोन्ही जोडीदारांची तपासणी करणे अत्यावश्यक आहे.

ठाण्यातील किम्स हॉस्पिटलमधील प्रसूती आणि स्त्रीरोग विभागाच्या प्रमुख डॉ. विद्या शेट्टी सांगतात, "यात पुरुषांची प्रजननक्षमता तितकीच महत्त्वाची आहे. वंध्यत्वाच्या जवळपास निम्म्या प्रकरणांमध्ये फक्त पुरुषांशी संबंधित कारणं किंवा दोघांशी संबंधित असलेली कारणं दिसून येतात."

डॉ. शेट्टी पुढं सांगतात, "म्हणूनच गर्भधारणेत अडचण येत असल्यास सर्वप्रथम वीर्य तपासणी (Semen Analysis) करण्याचा सल्ला दिला जातो. तपासणीत काही त्रुटी आढळल्यास किंवा अंडकोषावरील शस्त्रक्रिया, संसर्ग, अंडकोष उतरलेला नसणं, किमोथेरपी किंवा लैंगिक संबंधांतील समस्या यांचा इतिहास असल्यास पुढील तपासणी तातडीनं करणं आवश्यक आहे. फक्त महिलेची तपासणी करण्याऐवजी दोन्ही जोडीदारांचं एकत्र मूल्यमापन केल्यास उपचार अधिक प्रभावी ठरतात."

आयव्हीएफमुळे जुळी किंवा तिळी मुलं होतात का?

आयव्हीएफ (IVF) केल्यास नेहमीच जुळी किंवा तिळी मुलं होण्याची शक्यता असते हा याबाबतचा सर्वात मोठा गैरसमज आहे.

डॉ. विद्या शेट्टी सांगतात, "पूर्वी गर्भधारणेचे प्रमाण वाढवण्यासाठी एकापेक्षा अधिक भ्रूण गर्भाशयात स्थानांतरित केली जात असत. मात्र आज भ्रूण निवडीतील प्रगत तंत्रज्ञानामुळे अनेक रुग्णांमध्ये यशाची शक्यता कमी न करता एकच निरोगी भ्रूण स्थानांतरित करणे शक्य झालं आहे."

"यामुळे जुळी किंवा तिळी गर्भधारणा होण्याची स्थिती मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे."

भारतात एका आयव्हीएफ सायकलचा अंदाजे किती खर्च येतो? तसेच जोडप्यांनी कोणत्या अतिरिक्त खर्चाची तयारी ठेवावी? हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. जोडप्यांना याच्या खर्चाचा अंदाज असणं आवश्यक आहे.

आयव्हीएफच्या आधी आणि प्रक्रियेदरम्यान जीवनशैली कशी असावी?

आयव्हीएफची तयारी उपचार सुरू होण्यापूर्वीच सुरू झाली पाहिजे, असं डॉ. शेट्टी सांगतात.

आयव्हीएफआधी काय काळजी घ्यावी याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "दोन्ही जोडीदारांनी योग्य वजन राखावं, संतुलित आहार घ्यावा, नियमित व्यायाम करावा, धूम्रपान पूर्णपणे बंद करावं, मद्यपान मर्यादित ठेवावं आणि पुरेशी झोप घ्यावी."

"मधुमेह, थायरॉईड विकार किंवा उच्च रक्तदाब यांसारखे आजार उपचार सुरू करण्यापूर्वी नियंत्रणात असावेत. डॉक्टरांनी दिलेली औषधे वेळेवर घेणे आणि सर्व नियोजित भेटी व तपासण्या पूर्ण करणेही अत्यंत महत्त्वाचे आहे. उपचारापूर्वी आणि उपचारादरम्यान घेतलेली ही छोटी पावले अंतिम यशात मोठा फरक घडवू शकतात."

आयव्हीएफ ही केवळ वैद्यकीय प्रक्रिया नसून अनेकांसाठी तो एक भावनिक प्रवासही असतो.

या उपचारामध्ये हार्मोनची इंजेक्शने, वारंवार स्कॅन, विविध प्रक्रिया आणि प्रतीक्षाही करावी लागते, त्यामुळे ताण येणं स्वाभाविक आहे. या काळात जोडप्यांना आशा, चिंता आणि निराशा अशा विविध भावना अनुभवाव्या लागू शकतात.

शारीरिक तयारीइतकीच मानसिक तयारीही महत्त्वाची आहे. वास्तववादी अपेक्षा ठेवणं, एकमेकांशी मोकळेपणानं संवाद साधणं, शंका असल्यास डॉक्टरांना विचारणे आणि आवश्यक वाटल्यास समुपदेशन घेणे यामुळे हा प्रवास अधिक सुलभ होतो.

आयव्हीएफला किती खर्च येतो?

डॉ. विद्या शेट्टी सांगतात, "भारतामध्ये एका आयव्हीएफ सायकलचा खर्च साधारणपणे ₹1.5 लाख ते ₹2.5 लाख इतका असतो. हा खर्च उपचार केंद्र आणि प्रत्येक रुग्णाच्या उपचार योजनेनुसार बदलू शकतो.

"याशिवाय प्रजननक्षमतेसाठी लागणारी औषधे, ICSI सारख्या प्रक्रिया, भ्रूण गोठवणे (Embryo Freezing), त्याचे साठवण शुल्क आणि काही निवडक प्रकरणांमध्ये जनुकीय तपासण्या यासाठी अतिरिक्त खर्च लागू शकतो."

त्या सांगतात, "काही जोडप्यांना एकापेक्षा अधिक आयव्हीएफ सायकलची गरजही भासू शकते. त्यामुळे उपचार सुरू करण्यापूर्वी अपेक्षित खर्च आणि संभाव्य अतिरिक्त प्रक्रियांबाबत उपचार करणाऱ्या डॉक्टरांशी सविस्तर चर्चा करणे आवश्यक आहे."

गेल्या काही वर्षांत आयव्हीएफ अधिक वैयक्तिक गरजांनुसार (Personalised) करण्यात येऊ लागलं आहे.

भ्रूण संवर्धनातील सुधारित तंत्रज्ञान, ब्लास्टोसिस्ट ट्रान्सफर, व्हिट्रिफिकेशनसारख्या अत्याधुनिक भ्रूण गोठवण्याच्या पद्धती आणि अधिक प्रगत प्रयोगशाळा सुविधांमुळे गर्भधारणेचे यशस्वी प्रमाण वाढलं आहे.

निवडक रुग्णांमध्ये प्री-इम्प्लांटेशन जेनेटिक टेस्टिंग (PGT) द्वारे भ्रूणामधील काही जनुकीय दोष आधीच ओळखता येतात. या प्रगतीमुळे प्रत्येक जोडप्याच्या गरजेनुसार उपचाराची योजना आखणं शक्य झालं आहे.

जीवनशैलीमध्ये कोणताही महत्त्वाचा बदल करायचा असेल, आहारात बदल करायचा असेल, औषधे घ्यायची असतील तर तसेच शारीरिक व्यायामाची सुरुवात करायची असेल तर डॉक्टरांचा आणि योग्य प्रशिक्षकांची मदत घेणं आवश्यक आहे.

आपल्या शरीराची तसेच लक्षणांची योग्य तपासणी डॉक्टरांकडून करुन घेऊन त्यांच्या सल्ल्यानेच जीवनशैलीत बदल करणं योग्य आहे. डॉक्टरांना न दाखवता स्वतःच उपचार करणे धोकादायक ठरू शकते.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)