धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा राष्ट्रपतींनी केला मंजूर, शिक्षण खात्याचा पदभार प्रल्हाद जोशींकडे

Published
वाचन वेळ: 8 मिनिटे

NEET-UG परीक्षेतील कथित अनियमितता, त्यानंतर झालेलं आंदोलन आणि गेल्या काही दिवसांत निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवला.

राष्ट्रपती भवनाने जारी केलेल्या निवेदनानुसार, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला आहे.

याच निवेदनात, पंतप्रधानांच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींनी केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला असल्याचं म्हटलं आहे.

प्रल्हाद जोशी सध्या ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री असून, त्यांच्याकडे नवीन व अपारंपरिक ऊर्जा मंत्रालयाची जबाबदारीही आहे.

जंतर-मंतर येथे आंदोलन करणाऱ्या अभिजीत दिपके यांनी, 'या सरकारमध्ये राजीनामे घेतले जात नाहीत असं म्हटलं जात होतं. पण आम्ही करुन दाखवलं' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले, "धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. जर तुम्ही घाबरलात नाही, या सरकारसमोर झुकलात नाही, तर कुणाचाही राजीनामा घेऊ शकता, याचाच हा पुरावा आहे. लोकशाहीत घाबरून राहायचं नसतं. राजीनामा देऊन झाला आहे, पण अजून मीटिंग होणार आहे. आज संध्याकाळी 6 वाजता देशभरात कॅण्डल मार्च काढण्यात येणार आहे. "

यानंतर दुपारी केंद्र सरकारमधील मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांची सीजेपी प्रतिनिधींशी बैठक झाली. त्या बैठकीनंतर दिल्लीमध्ये पत्रकार परिषद झाली. यात आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांवरील गुन्हे रद्द करण्याचा निर्णय जे. पी नड्डा यांनी जाहीर केला. पाठोपाठ सौरभ दास यांनी हे आंदोलन संपुष्टात आल्याचं सांगितलं.

या निर्णयानंतर मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. दिपके जे निर्णय घेतील त्याला आमचा पाठिंबा असेल. या यशाचा जल्लोश करण्यासाठी उद्या शिवाजी पार्कवर उद्या मोर्चा होणारचं असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

सर्व मागण्या मान्य

सीजेपीचं शिष्टमंडळ आणि सरकार यांच्यात झालेल्या चर्चेनंतर संयुक्त पत्रकार परिषदेत याबाबत माहिती देण्यात आली. सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास यांनी सरकारनं मागण्या मान्य केल्याचं सांगितलं.

या बैठकीत खालील मुद्द्यांवर एकमत झालं.

  • आंदोलनकर्ते किंवा सीजेपीच्या कोणत्याही सदस्याविरुद्ध दाखल करण्यात आलेले सर्व एफआयआर मागे घेतले जातील आणि भविष्यातही त्यांच्याविरुद्ध कोणतीही कारवाई केली जाणार नाही. याबाबत सरकार मंगळवारपर्यंत लेखी हमी देणार असल्याचंही सीजेपीनं म्हटलं.
  • सरकारने नीट (NEET) पेपर लीक प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना योग्य(कमाल) नुकसानभरपाई देण्यास सहमती दर्शवली आहे.
  • सीजेपीने सादर केलेल्या परीक्षा सुधारणा विषयक पाच कलमी सूचना (Five-Point Charter) विचारात घेण्यास सरकारने सहमती दर्शवली आहे.

दरम्यान पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले की, "आज सौरभ दास आणि रांका यांच्यासोबत आमची तिसरी बैठक झाली. पुन्हा एकदा सविस्तर चर्चा झाली. ते आज लेखी मसुदा घेऊन आले होते. आंदोलनादरम्यान दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांबाबत त्यांनी चार मुद्दे मांडले. त्याचबरोबर त्यांनी उर्वरित दोन मागण्याही मांडल्या. सूडबुद्धीने कोणतीही कारवाई केली जाऊ नये, नुकसानभरपाई द्यावी आणि त्यांनी सादर केलेल्या पाच कलमी सनदेचा विचार करण्यात यावा अशा त्या मागण्या होत्या.

या सर्व मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. चर्चेनंतर पहिला निर्णय असा झाला की, विद्यार्थ्यांवर पुढं कोणतीही कारवाई केली जाणार नाही आणि कोणतेही नवे एफआयआर दाखल केले जाणार नाहीत. तसेच, दिल्ली पोलिसांनी किंवा भाजपशासित राज्यांमध्ये यापूर्वी कोणतेही एफआयआर दाखल केले असतील, तर त्या सर्व एफआयआरच्या प्रती सरकार त्यांना उपलब्ध करून देईल. तसंच गुन्हे रद्द केले जातील आणि नंतर कोणतीही कारवाई होणार नाही. "

यानंतर सीजेपीच्या प्रवक्त्यांनी आंदोलन थांबवण्याची घोषणा केली. तसंच सर्व विद्यार्थ्यांनी शांततेत घरी परतावं असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं.

सीजेपीनं आधी काय म्हटलं होतं?

धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सीजेपीनं एक्स प्लॅटफॉर्मवर आपल्या मागण्या पुन्हा लिहिल्या होत्या.

त्यात "सीजेपीच्या मागण्यांची यादी अद्ययावत करण्यात आली आहे:

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा – ✅ पूर्ण

आत्महत्या केलेल्या सर्व विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांना 1 कोटी रुपयांची मदत द्यावी – प्रलंबित

आंदोलनात सहभागी झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यावर कारवाई करू नये – प्रलंबित

आरएएफ (RAF) आणि दिल्ली पोलीसांनी जाहीरपणे माफी मागावी – प्रलंबित

जंतर-मंतरवरील आंदोलनकर्ते आणि देशभरातील लोक अजूनही या उर्वरित मागण्या पूर्ण होण्याची वाट पाहत आहेत," असं म्हटलं होतं.

नड्डांबरोबरच्या चर्चेनंतर सीजेपीच्या प्रवक्त्यांनी या मागण्या मान्य झाल्यानं आंदोलन थांबवत असल्याचं म्हटलं आहे.

हा लोकशाहीचा विजय- सोनम वांगचूक

सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांनी शनिवारी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचं स्वागत करत त्याला लोकशाहीचा विजय म्हटलं आहे.

वांगचुक यांनी एक्सवरील पोस्टमध्ये लिहिलं, "हा लोकशाहीचा विजय आहे. थेट रस्त्यावर उतरलेल्या लोकांनी मिळवलेला लोकशाहीचा विजय आहे. हा शांतता, संयम आणि दृढनिश्चयाचा विजय आहे. कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आणि देशातील 'जेन झी' पिढीचं अभिनंदन."

तसंच, "देशाच्या कानाकोपऱ्यातून भीती आणि भीतीची भीती झुगारून आवाज उठवणाऱ्या सर्व नागरिकांचेही आभार," असं त्यांनी म्हटलं.

पोस्टच्या शेवटी त्यांनी "जबाबदारी निश्चित करण्यापासून आता सुधारणांच्या दिशेने वाटचाल" असं लिहिलं.

NEET पेपरफुटीच्या मुद्द्यावर सोनम वांगचुक यांनी 26 दिवस उपोषण केलं होतं. 28 जून रोजी त्यांनी जंतर-मंतरवरील सीजेपीच्या मंचावरून आपल्या उपोषणाला सुरुवात केली होती.

गुरुवार आणि शुक्रवारच्या मध्यरात्री केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा आणि जितेंद्र सिंह यांनी त्यांचं उपोषण सोडवलं. वांगचुक सातत्याने केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत होते.

माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटतो- अनिता दिपके

छत्रपती संभाजीनगर येथे कॉक्रोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अध्यक्ष अभिजित दिपके यांच्या आई अनिता दिपके यांनी मुलाच्या आंदोलनाबद्दल अभिमान व्यक्त केला. "मला खूप आनंद झाला आहे. माझ्या मुलाचा खूप अभिमान वाटतो," असं त्या म्हणाल्या.

मात्र, आंदोलनादरम्यान अभिजित यांच्यावर झालेल्या मारहाणीमुळे आपण सतत चिंतेत असल्याचंही त्यांनी सांगितलं. "कधी कधी खूप भीती वाटायची. त्याला मारहाण करण्यात आली, थप्पड मारण्यात आली. त्याचं पुढे काय होईल, याची काळजी सतत लागून राहायची. यामुळे मला खूप वाईट वाटलं. अनेक रात्री झोपच लागली नाही. पहाटे तीन-चार वाजेपर्यंत जागी असायचे," असं त्यांनी सांगितलं.

या काळात संपूर्ण कुटुंबावर ताण असल्याचं सांगताना त्या म्हणाल्या, "मला आणि कुटुंबातील इतरांनाही नीट जेवण जात नव्हतं. भूकच उरली नव्हती. 7 जूनपासून घरात कोणत्याही कामात मन लागत नव्हतं."

अभिजित दिपके यांच्या कामाचं कौतुक करताना अनिता दिपके म्हणाल्या, "त्याने खूप मोठं काम केलं आहे. तो अजून खूप तरुण आहे, पण एवढ्या लहान वयात त्याने इतकी मोठी गोष्ट साध्य केली आहे. त्याचा मला खूप अभिमान आहे."

हे सरकार बदलण्याची वेळ आता आली आहे- राहुल गांधी

प्रधान यांच्या राजीनाम्यावर लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी मत व्यक्त केलं आहे.

ते म्हणतात, "धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा आपल्या शिक्षण व्यवस्थेच्या पुनर्रचनेकडे टाकलेलं एक मोठं पाऊल आहे. देशभरातील विद्यार्थ्यांचं मनःपूर्वक अभिनंदन. आम्हाला तुमचा अभिमान आहे. रस्त्यावर उतरून लोकशाही, संविधान आणि आपल्या भविष्याच्या रक्षणासाठी ठामपणे उभ्या राहिलेल्या प्रत्येक तरुणाचं, प्रत्येक विद्यार्थ्याचं हार्दिक अभिनंदन. तथापि, अजूनही दोन मागण्या शिल्लक आहेत. विद्यार्थ्यांचा आणि भारताच्या भविष्याचा सन्मान राखत पंतप्रधानांनी माफी मागावी आणि विद्यार्थ्यांवर झालेल्या हिंसाचारासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करावी."

ते पुढं म्हणतात, "समाजातील इतर घटकांसाठी शेतकरी, कामगार, गरीब आणि या सरकारने ज्यांना दडपलं व चिरडलं आहे अशा प्रत्येक नागरिकासाठी आपल्या स्वाभिमानासाठी संविधानाच्या चौकटीत राहून ठामपणे उभं राहणं, हेच खरं धैर्य आहे. हे सरकार बदलण्याची वेळ आता आली आहे."

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते शरद पवार यांनी प्रधान यांच्या राजीनाम्यावर एक्स प्लॅटफॉर्मवर प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

ते लिहितात, "NEET पेपरफुटीप्रकरणी दिल्लीत जंतर-मंतरवर सलग २८ दिवस तरुणाईने दिलेला लढा आणि दाखवलेली जिद्द वाखाणण्याजोगी आहे. आंदोलकांच्या आग्रही मागणीनुसार आज अखेर केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा दिला. दडपशाहीला न घाबरता अन्यायाविरुद्ध ठामपणे उभे राहून सरकारला नैतिक जबाबदारी स्वीकारायला भाग पाडणारा हा लढा लोकशाहीच्या ताकदीचे प्रतीक आहे. हा देशातील युवाशक्तीच्या एकजुटीचा मोठा विजय आहे. तसंच, विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांनी ज्या पद्धतीने देशातील युवकांना नैतिक आणि संसदीय पाठबळ दिलं त्याबद्दल विरोधी पक्षातील सर्व खासदारांचे मनःपूर्वक आभार. देशातील लोकशाहीने कात टाकली आहे, आणि त्याचं श्रेय देशातील युवा पिढीला जातं हे निश्चितपणे नमूद करावसं वाटतं."

प्रकाश आंबेडकर यांची धर्मेंद्र प्रधानांवर टीका

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिला असला, तरी त्यांच्या राजीनामा पत्रात अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर मौन पाळण्यात आल्याची टीका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनामा पत्रात आंदोलनात "अँटी सोशल एलिमेंट" घुसल्याचा उल्लेख केला आहे. मात्र, NEET प्रकरणाशी संबंधित आत्महत्यांबाबत कोणतीही खंत किंवा संवेदना व्यक्त केलेली नाही, असं आंबेडकर म्हणाले. "22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्याचा दावा केला जात असताना त्याबद्दल राजीनाम्यात एक शब्दही नाही," अशी टीका त्यांनी केली.

20 जुलै रोजी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिसांच्या कथित अमानुष कारवाईचाही राजीनाम्यात कुठेही उल्लेख नसल्याचं त्यांनी सांगितलं. तसेच मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना नुकसानभरपाई देण्याबाबत सरकारने कोणती भूमिका घेतली आहे, याबाबतही कोणतीही स्पष्टता देण्यात आलेली नसल्याचं ते म्हणाले.

"धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा देऊन आगीत तेल ओतण्याचं काम केलं आहे. जे झुकणार नाहीत, असं म्हणत होते, त्यांना आता नाक रगडावं लागलं," अशी टीकाही आंबेडकर यांनी केली.

सर्वोच्च न्यायालयातील सुनावणींचा उल्लेख करत, "सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनाही सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी असल्याचं दिसून येत आहे," असं ते म्हणाले.

आंदोलनाच्या सुरुवातीच्या टप्प्यात काही जणांनी विद्यार्थ्यांना "झुरळ" संबोधलं आणि त्यानंतर लाठीचार्जचे व्हिडिओ समोर आले. मात्र, "ते व्हिडिओ पाहायला आमच्याकडे वेळ नाही," अशी भूमिका काहींनी घेतली होती, याकडेही आंबेडकर यांनी लक्ष वेधलं.

नुकसानभरपाई आणि परीक्षाव्यवस्थेतील सुधारणांबाबत सरकार चर्चा करण्यास तयार नसताना आंदोलन मागे घेण्याचं कारण नाही, असं सांगत त्यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला.

"विद्यार्थी पुढे जो काही निर्णय घेतील, त्या निर्णयाला वंचित बहुजन आघाडीचा पूर्ण पाठिंबा असेल," असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

प्रधान यांचं विद्यार्थ्यांना पत्र

धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनाम्याची घोषणा करताना विद्यार्थ्यांना उद्देशून एक खुलं पत्र लिहिलं आहे.

विद्यार्थ्यांना उद्देशून लिहिलेल्या खुल्या पत्रात त्यांनी गेल्या दहा दिवसांतील घडामोडींमुळे आपण व्यथित झाल्याचं म्हटलं असून विद्यार्थ्यांचं भविष्य कायदेशीर पेचप्रसंग आणि राजकीय संघर्षात अडकू नये म्हणून हा निर्णय घेतल्याचं नमूद केलं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांनी पत्रात म्हटलं आहे की, 3 मे 2026 रोजी झालेल्या NEET-UG परीक्षेत अनियमितता उघड झाल्यानंतर केंद्र सरकारने तातडीने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला.

परीक्षा रद्द करून नव्या तारखेला पुन्हा परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच पुढील वर्षापासून ही परीक्षा संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेण्याचंही ठरवण्यात आलं.

20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांची परीक्षा सुरळीत पार पडणं ही सरकारची सर्वोच्च प्राथमिकता होती, असं त्यांनी म्हटलं आहे.

केंद्र सरकार, राज्य सरकारं, जिल्हा प्रशासन, पालक आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे 21 जून रोजी परीक्षा यशस्वीरित्या घेता आल्याचं त्यांनी नमूद केलं.

परीक्षेत गैरप्रकार उघड झाल्यानंतर पहिल्या दिवसापासून आपण जबाबदारी स्वीकारली होती आणि कोणत्याही विद्यार्थ्यावर अन्याय होऊ देणार नाही, असा निर्धार केला होता, असंही प्रधान यांनी म्हटलं आहे. 16 जुलै रोजी जाहीर झालेल्या निकालांमध्ये गरीब कुटुंबांतील अनेक विद्यार्थ्यांना यश मिळाल्याचा दावाही त्यांनी केला.

मात्र, या संपूर्ण काळात काही जबाबदार पदांवरील व्यक्तींनी विद्यार्थ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे आपण व्यथित झाल्याचं त्यांनी पत्रात नमूद केलं. गेल्या दहा दिवसांतील घटनाक्रम पाहून मन दुःखी झालं असून हा प्रश्न आपल्या वैयक्तिक प्रतिष्ठेचा नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

पत्रात त्यांनी आंदोलनांचा थेट उल्लेख करत जंतर-मंतर आणि देशातील सध्याच्या परिस्थितीचा राष्ट्रविरोधी शक्तींना फायदा होऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

तसेच कोणत्याही विद्यार्थ्याचं भविष्य कायदेशीर लढायांमध्ये अडकू नये, विद्यार्थ्यांनी आपला वेळ आंदोलनात न घालवता शिक्षण आणि करिअर घडवण्यावर लक्ष केंद्रित करावं, असंही त्यांनी म्हटलं आहे.

"भारताची युवा शक्ती ही देशाची खरी ताकद आहे. देशाच्या युवाशक्तीला भ्रमाच्या चक्रात अडकू देणार नाही," असं सांगत विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करून आपण पंतप्रधानांकडे राजीनामा पाठवल्याचं धर्मेंद्र प्रधान यांनी स्पष्ट केलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे मार्गदर्शन, विश्वास आणि सहकार्याबद्दल त्यांनी आभार मानले असून भविष्यातही राष्ट्रसेवेसाठी कार्यरत राहण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.