धर्मेंद्र प्रधान : पेपरफुटी विरोधात केलं होतं आंदोलन, आता त्याच मुद्द्यावरून राजीनामा

    • Author, संदीप साहू
    • Role, बीबीसी हिंदी
    • Reporting from, भुवनेश्वर
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

हा विरोधाभासच म्हणावा लागेल की कधी काळी पेपरफुटीविरोधात निदर्शनं करताना पोलिसांच्या लाठीमुळे जखमी झालेल्या धर्मेंद्र प्रधानांना पेपरफुटीसाठीच्याच प्रकरणावरून राजीनामा द्यावा लागला आहे.

NEET पेपर लीकविरोधात सुरू असलेल्या आंदोलनात देशातील अनेक विद्यार्थी पोलिसांच्या लाठीमुळे जखमी झाले आहेत.

या आंदोलकांची प्रमुख मागणी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी आहे. त्याच धर्मेंद्र प्रधानांनी कधीकाळी पेपर लीकविरोधात आंदोलन केले होते आणि सुरक्षा दलाच्या लाठ्या देखील खाल्ल्या होत्या.

2021 साली 'द न्यू इंडियन एक्सप्रेस'मध्ये प्रकाशित झालेली एक बातमी सध्या अनेक ठिकाणी झळकत आहे.

या बातमीनुसार 1997 मध्ये ओडिशात माजी मुख्यमंत्री जे. बी. पटनायक यांच्या सरकारमध्ये एक पेपर फुटला होता.

त्याच्याविरोधात भारतीय विद्यार्थी परिषदेनी (ABVP) मंत्रालयासमोर आंदोलन केलं होतं. त्या आंदोलनाचे नेतृत्व धर्मेंद्र प्रधान यांनी केले होते आणि त्यात ते पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी देखील झाले होते.

या घटनेच्या 29 वर्षांनी 20 जुलै 2026 रोजी अनेक तरुण-तरुणी विद्यार्थ्यांना पोलिसांच्या लाठीहल्ल्यात जखमी व्हावे लागले असून अनेकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. धर्मेंद्र प्रधान यांनी शिक्षणमंत्री पदाचा राजीनामा द्यावा यासाठी ही निदर्शनं देशभरात सुरू आहेत.

पेपरफुटी प्रकरणासाठी आंदोलनात लाठी खाणे ते पेपरफुटी प्रकरणामुळे देशभरातून राजीनाम्याची मागणी

1997 साली धर्मेंद्र प्रधान यांच्यासह आंदोलनात सहभागी झालेल्या प्रशांत राऊत यांनी बीबीसी हिंदीशी बोलताना या गोष्टीला दुजोरा दिला आहे.

राऊत हे सध्या भुवनेश्वरमधील पटिया भागातील राजा माधवानंद देव कॉलेजच्या अध्यक्ष पदावर कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, त्या काळात मी एबीव्हीपीच्या भुवनेश्वर शाखेचा अध्यक्ष होतो आणि धर्मेंद्र प्रधान हे एबीव्हीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस होते. मला तारीख स्पष्ट आठवत नाहीये. पण 1997 जुलैच्या तिसऱ्या आठवड्यातील कोणतातरी दिवस (बहुतेक 17 किंवा 18 तारीख) असावा. 12 वीचे पेपर फुटल्याच्या विरोधात एबीव्हीपीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या नेतृत्वात विधानसभेसमोर आंदोलन केले होते."

"1988 ते 1997 या काळात दरवर्षी पेपर फुटत असत. यामुळे आम्ही त्या काळाला डिकेड ऑफ क्वश्चन पेपर लीक ( पेपरफुटीचे दशक) म्हणत होतो. आंदोलकांना पांगवण्यासाठी रॅपिड अॅक्शन फोर्सच्या जवानांनी आमच्यावर जोरदार लाठीहल्ला केला होता. त्यात 64 कार्यकर्ते जखमी झाले होते. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. जखमींमध्ये धर्मेंद्र प्रधान यांचा देखील समावेश होता," असं राऊत यांनी सांगितले.

विद्यापीठाच्या विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर

शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा दीर्घकालीन राजकीय प्रवास 80 च्या दशकात विद्यार्थी संघटनेपासूनच सुरू झाला.

लहानपासूनच ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विद्यार्थी संघटन आखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP) संलग्नित राहिले आणि नंतर तालचेर कॉलेज विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष म्हणून निवडून आले.

पुढे त्यांनी एबीव्हीपीकडून उत्कल युनिव्हर्सिटीत विद्यार्थी संघाची अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवली. पण तत्कालीन जनता दलाच्या विद्यार्थी संघटनेचे नेते आणि सध्या बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेता अरुण साहू यांच्याकडून त्यांचा पराभव झाला होता. त्या निवडणुकीत धर्मेंद्र प्रधान तिसऱ्या क्रमांकावर आले. दुसऱ्या क्रमांकावर काँग्रेसच्या विद्यार्थी संघटनेच्या उमेदवार सिंधुज्योती त्रिपाठी या दुसऱ्या क्रमांकावर होत्या. दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकातील मतांमध्ये फरक खूपच कमी होता.

प्रधान यांच्या विद्यार्थी जीवनाबाबत सिंधुज्योती त्रिपाठी यांनी बीबीसीला सांगितले, धर्मेंद्र हे अत्यंत सामान्य विद्यार्थी होते. खरं सांगायचं झालं तर एबीव्हीपीकडून अध्यक्ष पदाचे उमेदवार म्हणून त्यांचं नाव जाहीर होण्याआधी कॅम्पसमधील खूप कमी लोक त्यांना ओळखत होते. पण त्या काळात उत्कल युनिव्हर्सिटीत एबीव्हीपीचे संघटन मजबूत होते आणि त्यांना चांगले मत पडले.

या निवडणुकीत प्रधान यांना हरवणारे अरुण साहू पुढे बिजू जनता दलाचे एक प्रमुख नेता बनले आणि राज्याचे उच्च शिक्षण मंत्री देखील बनले. योगायोगाने 2019 साली उत्कल युनिव्हर्सिटीच्या 70 वर्षपूर्ती निमित्त झालेल्या समारंभात धर्मेंद्र प्रधान आणि अरुण साहू हे दोघेही कार्यक्रमासाठी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपले जुने राजकीय प्रतिस्पर्धी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत तुम्हाला काय वाटतं असं अरुण साहू यांना बीबीसीने विचारले असता ते म्हणाले, माझे नेता आणि पार्टीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांचं स्पष्ट मत आहे की धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा द्यावा आणि माझं मत देखील काही वेगळं नाही.

प्रधान यांच्या राजकीय उत्कर्षाबाबत साहू यांनी सांगितले की तुम्हाला तर माहीतच आहे की भाजपात सर्व निर्णय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडूनच घेतले जातात. ते दीर्घकाळापासून संघात आहेत आणि ते देखील त्या काळापासून की जेव्हा ओडिशात भाजपची खास ओळख नव्हती. त्यामुळे त्यांना पार्टीत आणि नंतर सरकारमध्ये मोठं पद मिळणं साहाजिक होतं.

साहू सांगतात की त्यांचे प्रधान यांच्याशी चांगले संबंध आहेत परंतु आजकाल ते त्यांच्याशी बोलणं किंवा भेटणं खूपच कमी झालं आहे.

धर्मेंद्र प्रधान यांची राजकीय कारकीर्द

उत्कल युनिव्हर्सिटीत निवडणूक हारल्यानंतर देखील धर्मेंद्र प्रधान यांचा राजकीय उत्कर्ष सुरू राहिला. आपल्या मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर ते भाजपात विद्यार्थी आणि युवा संघटनेत यशाच्या पायऱ्या चढत राहिले.

1994 मध्ये प्रधान एबीव्हीपीचे राष्ट्रीय सरचिटणीस बनले आणि 1997 पर्यंत ते या पदावर कार्यरत होते. 2004 ते 2006 या काळात भारतीय जनता युवा मोर्चाचे अध्यक्ष बनले. नंतर भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस बनले. आणि पदावर राहून उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक या राज्यांचे प्रभारी म्हणून त्यांनी काम पाहिले आणि या राज्याच्या निवडणुकांमध्ये पार्टीच्या विजयात मोलाचा वाटा उचलला.

धर्मेंद्र प्रधान यांचे निवडणुकातील कारकीर्द 2000 मध्ये सुरू झाली. त्यावेळी त्यांनी बीजेडी आणि बीजेपी युतीचे उमेदवार म्हणून पाललहडा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती आणि ते आमदार म्हणून निवडून आले.

त्यानंतर चार वर्षांनी त्यांनी देवगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि ते खासदार म्हणून निवडून आले. आता देवगड हा मतदारसंघ नाहीये तर तो संबलपूर मतदारसंघाशी जोडला गेलाय. 2024 मध्ये प्रधान हे याच मतदारसंघातून निवडून येऊन खासदार बनले.

मधल्या काळात त्यांनी लोकसभा किंवा विधानसभा निवडणूक लढवली नव्हती. परंतु पक्षातील आपल्या वजनामुळे ते दोन वेळा दुसऱ्या राज्यातून राज्यसभेवर गेले. एप्रिल 2012 ते एप्रिल 2018 मध्ये बिहारमधून आणि एप्रिल 2018 ते एप्रिल 2024 पर्यंत मध्य प्रदेशमधून ते राज्यसभेवर गेले.

2014 मध्ये जेव्हा नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात केंद्रात भाजपचे सरकार बनले तेव्हा प्रधान यांना पेट्रोलियम राज्य मंत्री बनवण्यात आले. त्यावेळी ते बिहारमधून राज्यसभेवर खासदार म्हणून निवडून आले होते. दोन दशकांनंतर 2024 मध्ये त्यांनी ओडिशातून लोकसभा निवडणूक लढवली आणि संबलपूर येथून ते लोकसभेचे खासदार बनले.

धर्मेंद्र प्रधान यांच्या घरी अमित शाह यांचा मुक्काम

प्रधान यांच्या सोबत विद्यार्थीदशेत राजकारणात असलेल्या सिंधुज्योती त्रिपाठी यांना वाटतं की भाजप आणि सरकारमध्ये धर्मेंद्र प्रधान यांच्या उत्कर्षाचे कारण म्हणजे त्यांचे केंद्रीय आरोग्य मंत्री जे पी नड्डा आणि गृह मंत्री अमित शाह यांच्याशी असलेले वैयक्तिक घनिष्ठ संबंध. या गोष्टीची भूमिका महत्त्वपूर्ण राहिल्याचं त्यांना वाटतं.

त्या सांगतात की माझ्याकडे या गोष्टीचं पक्का पुरावा नाही परंतु माझ्या विश्वसनीय सूत्रांकडून मी ऐकलं आहे की जेव्हा कोर्टाने शाह यांच्याविरोधात तडीपारीचे आदेश दिले होते तेव्हा ते काही दिवस धर्मेंद्र प्रधान यांच्या तालचेर येथील घरी राहिले होते.

काही लोक भलेही प्रधान यांच्या यशाचे श्रेय त्यांच्या वैयक्तिक घनिष्ठ संबंधांना देतात पण ज्येष्ठ पत्रकार रुबेन बॅनर्जी सांगतात की त्यांच्या प्रतिभेचा अंदाज तत्कालीन मुख्यमंत्री आणि बीजेडीचे अध्यक्ष नवीन पटनायक यांना सुरुवातीपासूनच होता.

नवीन पटनायक यांच्यावर लिहिलेल्या पुस्तकात लिहितात रुबेन बॅनर्जींंनी लिहिले आहे की, 2000 मध्ये मतमोजणी सुरू होती आणि बातमी आली की पाललहडातून धर्मेंद्र आघाडीवर आहेत, तेव्हा पटनायक यांनी म्हटलं होतं 'ही माझ्यासाठी समस्या आहे.'

बॅनर्जी दावा करतात की ज्यावेळी पटनायक यांनी हे म्हटलं त्यावेळी ते त्यांच्यासोबत कारमध्ये होते. अनेक जण हा किस्सा विश्वसनीय मानत नाहीत कारण त्यावेळी नवीन पटनायक हे ओडिशाच्याच नव्हे तर राजकारणातच नवखे होते. पण या किश्शाबाबत बीबीसीने बॅनर्जींना पुन्हा एकदा विचारले आणि त्यांनी ही गोष्ट अगदी 'सोळा आणे' खरी असल्याचे सांगितले.

ओडिशात भाजपचा विस्तार

ओडिशात भाजपचे संघटन बळकट करण्यास, त्याला विस्तार देण्यास प्रधानांचा मुख्य वाटा असल्याचे बॅनर्जींना वाटते. 2014 मध्ये केंद्रात मंत्री बनल्यानंतर प्रधान प्रत्येक शनिवार-रविवार ओडिशात असत.

या काळात पक्षाचे संघटन मजबूत करण्याच्या दृष्टीने ते स्थानीय कार्यकर्त्यांशी संवाद साधत. अनेक जण या गोष्टीला गमतीत वीक एंड पार्टी म्हणत असत.

2014 ते 2019 या काळात प्रधान यांचे ओएसडी आणि खासगी सचिव राहिलेले संबित त्रिपाठी देखील या गोष्टीला दुजोरा देतात की राज्यात पक्ष संघटन मजबूत करण्यात प्रधान यांची महत्त्वाची भूमिका आहे.

त्यांनी सांगितले की राज्यभरातील ग्रास रुट वर काम करणार्या भाजप कार्यकर्त्याला ते वैयक्तिकरीत्या आणि त्यांच्या नावानिशी ओळखतात. केंद्रातील आपले वजन वापरून स्थानिक समस्या सोडवण्यात नेहमीच त्यांनी पुढाकार घेतला आहे.

त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत त्रिपाठी सांगतात की ही मागणी बिल्कुल योग्य नाहीये. विरोधी पक्षाकडून विद्यार्थ्यांच्या भावनांना वेपनाईज ( शस्त्रासारखे वापरणे) केले जात आहे.

याच प्रकारचं मत राज्यातील भाजपच्या इतर नेत्यांचे देखील आहे.

पक्षाचे ज्येष्ठ नेते सज्जन शर्मा सांगतात की, नीटच्या पाठीमागून विरोधी पक्ष आपली राजकीय पोळी भाजत आहे. जेव्हा परीक्षा दुसऱ्यांदा यशस्वीरीत्या पार पडली आहे आणि विद्यार्थी आपल्या यशाचे उत्सव साजरा करत आहे. तेव्हा या आंदोलनापाठीमागे राजकारणाऐवजी दुसरं काय कारण असू शकतं. हे आंदोलन म्हणजे विरोधी पक्षाकडून समजून उमजून सरकारला बदनाम करण्यासाठी खेळली गेलेली चाल आहे.

पार्टीच ज्येष्ठ नेते गोलक महापात्रा यांनी म्हटलंय की नीट तर केवळ निमित्त आहे. वास्तवात या सरकारने नवीन शैक्षणिक धोरण आणले, ज्यातून शिक्षण व्यवस्थेचे भारतीयकरण करण्यात आले आणि हीच गोष्ट विरोधी पक्षाला पटत नाहीये. पाठ्यक्रमात मुघलांना स्थान देणारे नवीन पटनायक आज शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा मागत आहेत. ते कदाचित विसरत आहेत की त्यांच्या शेवटच्या कार्यकाळात (2019 ते 2024) ओडिशात 9 वेळा पेपर फुटले होते.

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.