भविष्यात माणूस कसा दिसेल? माणसाच्या दिसण्याबद्दल आतापर्यंत उत्क्रांतीत कसे बदल घडले, जाणून घ्या

    • Author, कॅथरिन हिथवूड
    • Role, बीबीसी वर्ल्ड सर्विस
  • Published
  • वाचन वेळ: 7 मिनिटे

माणसाची रचना आजही विकसित होत आहे का आणि भविष्यात आपली वेगवेगळी रूपे असू शकतील का? आपली शारीरिक वाढ खूपच ठेंगणी किंवा आणखी उंच झाली तर काय होईल?

माणसाचे शारीरिक गुण, वैशिष्ट्ये बदलू शकतात किंवा माणसाला पूर्णपणे जेनेटिक पद्धतीने आधीच ठरवलेल्या रचनेनुसार तयार केलं जाऊ शकतं. जसजशी आपली संस्कृती विकसित होत गेली तसतसे आपण बदलत गेलो आहोत.

पूर्वी आजारपण, उपासमार आणि खराब हवामानासारखे बदल मानवी उत्क्रांतीसंदर्भात कारणीभूत ठरायचे. पण जसजशी मानवी संस्कृति विकसित होत गेली, तसतसा या घटकांचा आपल्यावरचा प्रभाव कमी होत गेला.

पण यूकेमधील एंग्लिया रस्किन युनिव्हर्सिटीचे मानववंशशास्त्रज्ञ आणि उत्क्रांती जनुकशास्त्रज्ञ डॉ. जेसन हॉजसन सांगतात की, मानवाचा विकास आजच्या काळातही सुरू आहे यात काही वाद नाही. हे आपल्याला यावरून समजते कारण काही विशिष्ट जीन्स (शारीरिक गुणधर्म ठरवणारे घटक) सध्या काही लोकसमूहांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येत आहेत. अर्थात हा बदल खूप मोठा नसून तो अनेक पिढ्यांच्या प्रवासानंतर समोर येतो. म्हणूनच कोणत्याही माणसाला आपल्या एका जीवनकाळात हा उत्क्रांतीचा बदल प्रत्यक्ष अनुभवता येत नाही.

मानवातील विविधता

अमेरिकेतील 'स्मिथसोनियन नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री'च्या तज्ज्ञ ब्रियाना पोबिनर यांच्या मते, माणसाचा गेल्या काही काळातील विकास आणि शरीरात झालेले बदल यामागे आपला आहार आणि खाण्यापिण्याच्या सवयी हे एक खूप मोठे कारण राहिले आहे.

त्या पुढे सांगतात की, आज जगातील जवळजवळ एक तृतीयांश प्रौढ लोकसंख्या दूध सहज पचवू शकते. पण 5 ते 10 हजार वर्षांपूर्वी कोणालाही असे करणे शक्य नव्हते. उत्क्रांतीच्या दृष्टीने हा अतिशय वेगाने झालेला बदल मानला जातो.

याची सुरुवात झाली जेव्हा माणसाने गाई-म्हशींसारखी दुभती जनावरे पाळायला सुरुवात केली. जेव्हा कधी दुष्काळ पडायचा तेव्हा दूध पचवण्याची क्षमता असणारे लोक सहज जगू शकायचे. कारण दुधात प्रथिने (प्रोटीन) आणि फॅट्स असायचे. हेच लोक जिवंत राहिल्यामुळे त्यांचे हे जीन्स त्यांच्या मुलांमध्ये आणि पुढच्या पिढ्यांमध्ये पसरत गेले. असे पोबिनर सांगतात.

निसर्गातील इतर अनेक घटकांनीही माणसाच्या शरीरात असे बदल घडवून आणण्यासाठी फार पूर्वीपासून मदत केली आहे.

हजारो वर्षांपूर्वी जेव्हा माणूस आफ्रिकेतून बाहेर पडून जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचला तेव्हा त्याला वेगवेगळ्या हवामानाशी सामना करावा लागला. त्यानुसार माणसाच्या शरीराने तिथल्या वातावरणाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली.

उदाहरणार्थ ज्या भागात सूर्यप्रकाश किंवा अतिनील किरणे (यूव्ही लाईट) कमी होती तिथे माणसाच्या त्वचेचा रंग फिकट (गोरा) होत गेला. जेणेकरून शरीराला पुरेसे 'विटामिन डी' मिळण्यास मदत होईल.

शास्त्रज्ञ हॉजसन स्पष्ट करतात की, जसजसे लोक एकमेकांपासून दूर जाऊन वेगवेगळ्या भागांत स्थायिक झाले तसतशी त्यांच्यामध्ये ही विविधता निर्माण होत गेली.

मात्र, आजच्या काळात स्थलांतर आणि जागतिकीकरणामुळे आपण सगळे वेगवेगळ्या माध्यमांतून पुन्हा एकदा एकमेकांशी जोडले गेलो आहोत. यामुळे माणसांमधील जैविक विविधता कदाचित कमी होईल असे वाटू शकते, परंतु ही गोष्ट दिसते तितकी सोपी नाही.

शास्त्रज्ञ हॉजसन सध्या 'असॉर्टेटिव्ह मेटिंग' (Assortative Mating) या संकल्पनेवर संशोधन करत आहेत. याचा अर्थ असा की, कोणतेही सजीव स्वतःसारख्याच दिसणाऱ्या किंवा स्वतःशी मिळते-जुळते गुणधर्म असणाऱ्या जोडीदाराची निवड करतात.

डॉ. हॉजसन सांगतात की, ही 'असॉर्टेटिव्ह मेटिंग'ची प्रक्रिया म्हणजेच स्वतःसारखाच जोडीदार निवडण्याच्या या पद्धतीमुळे निसर्गाचे आधीपासून चालत आलेले नियम आणखी वेगाने काम करू लागतात ज्यामुळे एखाद्या समूहात काही ठराविक शारीरिक गुणधर्म जास्त प्रमाणात वाढू शकतात.

संशोधनात असेही दिसून आले आहे कि, जी व्यक्ती जितकी उंच असते तिला तितकाच उंच जीवनसाथी मिळण्याची शक्यता जास्त असते. ते पुढे स्पष्ट करतात की, माणसाची उंची, वजन आणि चेहऱ्याची ठेवण यांसारख्या अनेक गोष्टी काही विशिष्ट समूहांमध्ये 'असॉर्टेटिव्ह' (म्हणजेच समान गुणधर्मांवर आधारित) आढळल्या आहेत. परंतु सर्वच समूहांमध्ये असे दिसून येत नाही. शेवटी या सगळ्याचा थेट परिणाम आपल्या शरीरातील जीन्सच्या प्रमाणावर होत असतो.

यामागे काही प्रमाणात सामाजिक आणि सांस्कृतिक कारणेही असतात. जसे की लोक सहसा आपल्याच समाजात किंवा समूहात लग्न करणे पसंत करतात. अर्थात आता काही समाजांमध्ये हे नियम आणि विचार बदलू लागले आहेत. हॉजसन यांच्या मते, अशा अनेक लहान-मोठ्या गोष्टींमुळे माणसाच्या शरीरात आणि त्याच्या उत्क्रांतीत आजही सतत बदल होत आहेत.

'सर्व काही माणसाच्या हातात'

आपले काही पर्याय किंवा निर्णय असेही असतात, ज्यांचा उत्क्रांतीवर कोणताही प्रभाव पडत नाही. पोबिनर याचे सोपे उदाहरण देतात. जर तुम्ही जिममध्ये जाऊन मेहनत केली आणि बॉडी बनवली, तर याचा अर्थ असा नाही की तुमच्या मुलांनाही तशीच बॉडी मिळण्याचे जीन्स जन्मासोबत मिळतील.

आजकाल दातांची ठेवण नीट करण्यापासून ते प्लास्टिक सर्जरीसारख्या कॉस्मेटिक उपचारांपर्यंत, माणूस स्वतःच्या आयुष्यात स्वतःचे रूप सहज बदलू शकतो. हे बदल निसर्गाच्या कोणत्याही नियमामुळे होत नसून, समाजात काय चांगलं दिसतं या माणसाच्या आवडीमुळे होत असतात.

इंटरनॅशनल सोसायटी ऑफ एस्थेटिक प्लास्टिक सर्जरी'च्या माहितीनुसार, 2024 मध्ये जगभरात साधारण साडेतीन कोटींहून अधिक सर्जिकल आणि नॉन-सर्जिकल सौंदर्यविषयक उपचार केले गेले.

2020 च्या तुलनेत यामध्ये तब्बल 40 टक्क्यांची वाढ झाली आहे. याचा अर्थ असा की, लोक जन्मापासून जसे दिसतात त्यापेक्षा काहीसे वेगळे आणि आकर्षक दिसण्याची त्यांची इच्छा आता कमालीची वाढत चालली आहे.

डेन्मार्कच्या आरहस युनिव्हर्सिटीचे माजी प्राध्यापक आणि तज्ज्ञ थॉमस मेलुंड यांच्या मते, मेडिकल सायन्समुळे स्वतःचे रूप बदलणे आता इतके सोपे झाले आहे की, आपले जीन्स आपल्याला जसे रूप देतात माणूस हुबेहूब तसाच दिसेल असे आता राहिलेले नाही.

विशेष म्हणजे, येत्या काळात आपण फक्त बाह्य रूप बदलण्यापुरतेच थांबणार नाही. तर वैज्ञानिक सध्या 'क्रिस्पर' (CRISPR) नावाचे एक नवीन तंत्रज्ञान वापरत आहेत. ज्याच्या मदतीने थेट माणसाच्या जीन्समध्येच सुधारणा किंवा बदल करणे शक्य होणार आहे.

या तंत्रज्ञानामध्ये एक भाग शरीरातील महत्त्वाच्या डीएनएचा शोध घेतो आणि दुसरा भाग त्यामध्ये आवश्यक बदल करतो. हे तंत्रज्ञान दिवसेंदिवस खूप प्रगत होत चालले आहे आणि रक्ताच्या दोषांशी संबंधित काही अनुवांशिक आजारांवर उपचार करण्यासाठी आता याचा वापरही सुरू झाला आहे.

पुढे जाऊन हे तंत्रज्ञान खूप जास्त विकसित झाले आणि सर्वांना सहज उपलब्ध झाले तर भविष्यात माणसाचे इतर गुणधर्म थेट त्याच्या जीन्सच्या पातळीवर बदलणे सहज शक्य होईल. विशेष म्हणजे यासाठी अनेक पिढ्यांची वाट पाहावी लागणार नाही, तर हे काम एका झटक्यात होऊ शकेल. म्हणजेच आपल्या होणाऱ्या मुलांमध्ये आपल्याला हवे तसे गुण निर्माण करण्याची ताकद माणसाच्या हातात येऊ शकते.

आणि जर हा बदल 'जर्मलाइन' पेशींमध्ये म्हणजेच ज्या पेशी पुढे जाऊन शुक्राणू आणि अंडपेशी तयार करतात त्यात केला तर जीन्समध्ये केलेले हे बदल पुढच्या पिढ्यांमध्येही अनुवांशिकतेने पुढे जाऊ शकतात. परंतु हे सर्व अत्यंत सुरक्षितपणे आणि पूर्ण खात्रीने प्रत्यक्षात आणण्यापासून आपण अद्याप खूप दूर आहोत.

हॉजसन यांच्या मते, माणसाच्या बाबतीत असे करणे चुकीचे आहे आणि ते पूर्णपणे अनैतिक ठरेल. या गोष्टीला आता जगभरातून मान्यता मिळाली आहे. पण भविष्यात लोकांचा हा दृष्टिकोन बदलू शकतो, असा अंदाज ते लावतात. ते म्हणतात की, 5,000 वर्षांनंतर कदाचित याच्या अगदी उलट परिस्थिती पाहायला मिळेल. म्हणजेच एक काळ असा येईल जेव्हा जीन्समध्ये बदल करणे चुकीचे मानले जाणार नाही उलट ते न करणे हा गुन्हा किंवा अनैतिक गोष्ट मानली जाईल. कारण तोपर्यंत अनुवांशिक आजार मुळापासून संपवण्याची ताकद माणसाकडे आलेली असेल.

जर हे तंत्रज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले तर पालकांना एक वेगळा पर्याय मिळेल. ते जीन्स एडिटिंगच्या मदतीने आपल्या होणाऱ्या मुलांचा चेहरामोहरा आणि त्यांचे गुण स्वतः ठरवू शकतील. हॉजसन यांच्या मते, मोठ्या प्रमाणावर विचार केला तर माणसाच्या विकासाची दोरी पूर्णपणे माणसाच्याच हातात येणार आहे. पण अजून आपण त्या टप्प्यापासून खूप लांब आहोत. या तंत्रज्ञानाबाबत अजूनही अनेक गोष्टी जाणून घेणे बाकी आहे. आणि म्हणूनच आपल्या आयुष्यात तरी हे असं काही घडताना पाहावं लागणार नाही अशी अपेक्षा ते व्यक्त करतात.

मेलुंड यांच्या मते, भविष्यात निसर्गात आणि वातावरणात काय बदल होणार आहेत हे समजल्याशिवाय भविष्यात माणूस कसा दिसेल याचा अंदाज लावणे अशक्य आहे. जर आपण खूप दूरच्या भविष्याचा विचार केला तर कदाचित आपण एक नवीन प्रजाती बनलेलो असू. साधारण 10 लाख वर्षांपूर्वी पृथ्वीवर 'होमो इरेक्टस'सारख्या मानवी प्रजाती अस्तित्वात होत्या. त्यानंतर आपली स्वतःची 'होमो सेपियन्स' ही प्रजाती साधारण 3 लाख वर्षांपूर्वी जन्माला आली. मेलुंड स्पष्ट करतात की, जर आपण इथून पुढे आणखी 10 लाख वर्षांचा काळ पाहिला तर आपली पुढची पिढी आपल्यापेक्षा इतकी वेगळी असेल जितका फरक आज आपल्यात आणि होमो इरेक्टसमध्ये आहे.

पण तरीही मेलुंड एक गोष्ट स्पष्ट करतात की, वेगवेगळ्या प्रजातींमधील हा फरक आपल्याला वाटतो तितका सहज स्पष्ट दिसणारा नसेल. ते म्हणतात की, आज आपल्यासमोर एखादा होमो इरेक्टस आणून उभा केला तर तो आपल्यापेक्षा खूप वेगळा आहे हे आपण सहज ओळखू शकू का याबद्दल शंकाच आहे. असेही होऊ शकते की भविष्यात माणसाची ही जात दोन वेगवेगळ्या भागांत वाटली जाईल. समजा आपल्यातले काही लोक अंतराळात नवीन ठिकाणी राहायला गेले. मेलुंड यांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही चंद्रावर किंवा मंगळावर राहायला गेलात तर तिथे पृथ्वीपेक्षा खूप कमी गुरुत्वाकर्षण आहे त्यामुळे तिथल्या वातावरणानुसार स्वतःला शरीरात बदल करावे लागेल.

खरे तर एक नवीन मानवी प्रजाती तयार होण्यासाठी अंतराळात गेलेल्या या लोकांना अनेक पिढ्यांपर्यंत पृथ्वीवरील माणसांपासून पूर्णपणे तुटून वेगळे राहावे लागेल. पण आपण जर आपली उत्क्रांती केवळ नशिबाच्या स्वाधीन केली नाही तर काय होईल? जीन्स बदलण्याच्या तंत्रज्ञानामुळे माणसाला आता एक नवी ताकद मिळत आहे. यावरून मेलुंड असे मानतात की, भविष्यात निसर्ग किंवा जीवशास्त्र आपल्या शरीरात काय बदल घडवून आणेल यापेक्षा आपण स्वतः स्वतःसाठी काय पर्याय निवडतो हाच खरा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे.

(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)