You’re viewing a text-only version of this website that uses less data. View the main version of the website including all images and videos.
बिहारमध्ये विद्यार्थी आंदोलनात AK-47 रायफलने गोळीबार करण्याचं नेमकं प्रकरण काय?
बिहारच्या सिवान जिल्ह्यात 25 जुलै 2026 रोजी तत्कालीन केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गटावर एके-47 रायफल रोखल्याचा एक व्हीडिओ व्हायरल झाला आहे.
या व्हीडिओमुळं भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पोलिसांनी विद्यार्थ्यांवर एके-47 नं गोळीबार केल्याची ही देशातील पहिलीच घटना असल्याचं बिहारचे माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी बिहार पोलीस एसआयटी कॉन्स्टेबल अभिषेक पटेल यांना निलंबित करण्यात आल्याच्या वृत्ताला सिवानचे एसपी पुरण झा यांनी बीबीसी न्यूज हिंदीच्या प्रतिनिधी सीटू तिवारी यांच्याशी बोलताना दुजोरा दिला.
एसपी पुरण झा यांनी बीबीसी न्यूज हिंदीशी बोलताना म्हटलं की, तीनपैकी एका आंदोलकाला पोलिसांनी गोळी मारली, तर उर्वरित दोघांना गोळ्या कशा लागल्या याचा तपास सुरू आहे.
"जखमींपैकी कोणालाही एके-47 मधून झाडलेल्या गोळ्या लागल्या नाहीत. एके-47 चा गोळीबाराचा मार्ग हवेतून होता आणि त्यातून सुटलेली गोळी प्राणघातक असते," असं त्यांनी सांगितलं.
बीबीसीच्या प्रतिनिधी सीटू तिवारी यांनी दिलेल्या वृत्तानुसार, 25 जुलै रोजी झालेल्या निदर्शनादरम्यान 25 आंदोलकांना अटक करण्यात आली. जखमी झालेल्या तीन आंदोलकांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ कॉक्रोच जनता पार्टीनं (सीजेपी) सुरू केलेलं महिनाभराचं आंदोलन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर शनिवारी संपलं.
20 जुलै रोजी सीजेपीच्या संसदेवरील मोर्चादरम्यान झालेल्या पोलिसांच्या लाठीचार्जनंतर देशाच्या अनेक भागांमधून संताप व्यक्त झाला आणि अनेक राज्यांत आंदोलनं सुरू झाली.
राजदचे नेते तेजस्वी यादव यांनी सिवानमधील व्हीडिओचा मुद्दा उपस्थित करत म्हटलं की, देशात विद्यार्थी आंदोलनादरम्यान पोलिसांनी नियमांचं उल्लंघन करून एके-47 नं गोळीबार करण्याची ही पहिलीच घटना आहे.
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी, संपूर्ण यंत्रणा विद्यार्थ्यांच्या विरोधात मारेकऱ्यासारखी उभी आहे, असं म्हटलं आहे .
दरम्यान, भाजपनं असा आरोप केला की, राहुल गांधी कृत्रिम आंदोलनं घडवून आणण्याचा आणि अराजकतेचं वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.
काय आहे संपूर्ण प्रकरण ?
सोशल मीडियावर एक व्हीडिओ व्हायरल होत आहे. त्यात बिहार पोलिसांचा एक अधिकारी आंदोलन करणाऱ्या जमावावर एके-47 रायफल रोखताना दिसत आहे. या व्हीडओमध्ये गोळीबाराचा आवाजही ऐकू येत आहे.
बिहार पोलिसांनीही व्हीडिओची पुष्टी केली असल्याचं रॉयटर्स वृत्तसंस्थेनं म्हटलं आहे. रॉयटर्सने दिलेल्या वृत्तानुसार, बुलेटप्रूफ जॅकेट आणि हेल्मेट घातलेला एक पोलीस अधिकारी एके-47 रायफल घेऊन जमावाच्या दिशेने धावत येताना आणि हवेत किमान तीन गोळ्या झाडताना दिसत आहे.
बिहारचे पोलीस महानिरीक्षक नीलेश कुमार यांनी रॉयटर्सशी बोलताना, या घटनेत कोणीही जखमी झालं नाही आणि संबंधित पोलीस कॉन्स्टेबल सराईत गुन्हेगारांशी संबंधित गुप्तचर युनिटचा भाग होते आणि त्यांना असॉल्ट रायफल देण्यात आल्या होत्या, असं सांगितलं.
"कॉन्स्टेबलनं एके-47 चा गैरवापर केला. याचे कोणत्याही प्रकारे समर्थन केले जाऊ शकत नाही. असे करण्याची काहीच गरज नव्हती, म्हणूनच त्यांना निलंबित करण्यात आलं आहे. त्यांच्यावर सर्व संभाव्य कारवाई केली जाईल," असं नीलेश कुमार यांनी सांगितलं.
तेजस्वी यादव काय म्हणाले?
एके-47 रायफलच्या व्हायरल व्हिडिओवर बिहारपासून दिल्लीपर्यंतच्या राजकीय विरोधकांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनी, एके-47 ने विद्यार्थ्यांवर गोळीबार करण्याची ही पोलिसांची पहिलीच घटना असल्याचा दावा केला आहे.
एक्स वरील एका सोशल मीडिया पोस्टमध्ये त्यांनी लिहिलं की, "पाहा बिहारमध्ये एक पोलीस विद्यार्थी आंदोलकांवर AK-47 ने गोळीबार करत आहे? संपूर्ण देशात कोणत्याही विद्यार्थी आंदोलनावर पोलीस नियमावलीचे उल्लंघन करून AK-47 ने गोळीबार करण्याची ही पहिलीच घटना आहे."
"लोकशाहीमध्ये शांततापूर्ण आंदोलन करणं हा नागरिकांचा अधिकार आहे. हाच ट्रेंड सुरू राहिल्यास, भाजप सरकारं हक्कांसाठी लढणाऱ्या वकील, डॉक्टर, शिक्षक, न्यायाधीश, विद्यार्थी, तरुण, महिला आणि शेतकऱ्यांवर एके-47 ने गोळीबार करतील का?" असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
"उद्या, कोणताही पोलीस कर्मचारी कोणत्याही नेत्यावर, मंत्र्यावर किंवा अगदी मुख्यमंत्र्यांवरही, कधीही, कुठेही, कोणत्याही कारणाशिवाय गोळीबार करू शकतो. अशा प्रकरणांमध्ये, केवळ गोळी झाडणारी व्यक्तीच दोषी असेल का? त्या जिल्ह्याचे एसपी आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. गृहमंत्र्यांना जबाबदार धरलं पाहिजे, अन्यथा राज्यात अराजकतेची परिस्थिती निर्माण होईल. जनतेने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तीला बिहारचा मुख्यमंत्री म्हणून निवडून दिलेले नाही. हे निवडलेले मुख्यमंत्री आहेत, निवडून आलेले नाहीत," असंही तेजस्वी यादव म्हणाले.
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे राज्यसभेत म्हणाले की, "हा आपल्या लोकशाहीच्या इतिहासातील सर्वात मोठ्या हल्ल्यांपैकी एक आहे. आवाज उठवल्याबद्दल विद्यार्थ्यांना मारहाण करणे, फरफटत नेणे आणि गुन्हेगारांसारखी वागणूक देणे यापूर्वी कधीही घडले नव्हते."
"बिहारमध्ये विद्यार्थ्यांवर एके-47 चा वापर करण्यात आल्याचं समोर आलं आहे. यासाठी जबाबदार असणारे, हात झटकू शकत नाहीत."
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी इन्स्टाग्रामवरील एका पोस्टमध्ये म्हटलं की,"संपूर्ण व्यवस्था विद्यार्थ्यांच्या विरोधात आहे. बिहारमध्ये आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर एके-47 नं गोळीबार झाल्याचं वृत्त आहे. शेकडो विद्यार्थ्यांना अटक करून त्यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आले आहेत."
"मोदीजी, विद्यार्थ्यांविरुद्ध कोणताही एफआयआर दाखल केला जाणार नाही आणि त्यांना सोडले जाईल, या तुमच्या आश्वासनाचं काय झालं? उलट, त्यांच्यावर जीवघेणे हल्ले आणि क्रूरता केली जात आहे," असंही त्यांनी म्हटलं.
"दिल्लीत विद्यार्थ्यांवर पॅलेट गन आणि बिहारमध्ये एके-47 वापरण्यात आल्या. उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार किंवा दिल्ली असो, सर्वत्र तोच प्रकार दिसून येत आहे," असा आरोपही राहुल गांधींनी केला.
"हे सरकार अप्रामाणिक आहे, हे मी पूर्वीही सांगितलं आहे. सुधारणा घडवून आणणे या सरकारच्या क्षमतेच्या पलिकडे आहे. ते आश्वासनांपासून मागे हटतील आणि विद्यार्थ्यांचा आवाज दाबण्यासाठी प्रत्येक मार्गाचा वापर करतील," असंही त्यांनी म्हटलं.
राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींकडे देशातील विद्यार्थ्यांची माफी मागण्याची आणि विद्यार्थ्यांवर हल्ला करून त्यांना अमानुषपणे मारहाण करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.
भाजपचा राहुल गांधींवर आरोप
भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि लोकसभा खासदार संबित पात्रा यांनी लोकसभेतील विरोधी पक्षनेत्यांनी 'अत्यंत बेजबाबदार' वर्तन करणं ही 'लाजिरवाणी बाब' आहे, असं म्हटलं आहे.
संसद परिसरात पत्रकारांशी बोलताना पात्रा म्हणाले, "राहुल गांधींनी 'X' वर पोस्ट करून म्हटलं की, पोलिसांनी विद्यार्थी आंदोलकांवर एके-47 चा वापर केला. भारतातील विरोधी पक्षनेत्यासारख्या पदावर असलेल्या व्यक्तीने अशी खोटी माहिती पसरवणं हे पूर्णपणे निंदनीय आहे."
राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणी करताना पात्रा म्हणाले की, "ते खोटी माहिती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. एके-47... राहुल गांधींनी वापरलेल्या शब्दावर मला विशेष जोर द्यायचा आहे. या देशातील पोलीस कधी आंदोलकांवर गोळीबार करण्यासाठी एके-47 वापरतात का? असं कधी घडलं आहे का?"
"राहुल गांधी असं कसं म्हणू शकतात की एके-47 चा वापर झाला? हे पूर्णपणे अस्वीकार्य आहे आणि आमच्या मते, अशी खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवल्याबद्दल राहुल गांधींनी देशाची माफी मागावी," असंही ते म्हणाले.
राहुल गांधी आता देशात भीती आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोपही संबित पात्रा यांनी केला आहे.
"सीजेपीने स्वतःच आंदोलन मागे घेतले. जेपी नड्डा आणि जितेंद्र सिंह यांच्यासोबत चर्चा झाली, नंतर जंतर मंतर येथील सुरू असलेले आंदोलन संपवण्यात आल्याची घोषणा करण्यात आली," असंही त्यांनी म्हटलं.
"असा प्रचार आणि चुकीची माहिती पसरवून राहुल गांधी आणि काँग्रेस पक्षाला देशात भीती, गोंधळ आणि अराजकतेचे वातावरण निर्माण करायचे आहे. हे अत्यंत आक्षेपार्ह आहे. राहुल गांधींचे वक्तव्य गांभीर्याने घेऊ नका आणि सत्य समोर आणा, जेणेकरून देशात अराजकता पसरणार नाही,", असंही पात्रा म्हणाले.
"राहुल गांधींचा उद्देश समस्या सोडवणे नाही. त्यांचा उद्देश केवळ गोंधळ निर्माण करणे, कृत्रिम राग निर्माण करणे, कृत्रिम आंदोलनं उभी करणं आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे देशात अराजकता पसरवणं हा आहे," असा आरोपही पात्रा यांनी केला.
(बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.)