'उशिरा का होईना, पण योग्य निर्णय', धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर मुरली मनोहर जोशींची प्रतिक्रिया

Published
वाचन वेळ: 3 मिनिटे

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर अटल बिहारी वाजपेयी यांच्या कार्यकाळात केंद्रीय मंत्री राहिलेले ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी 'देर आए दुरुस्त आए' अशी प्रतिक्रिया दिली आहे.

केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा 25 जुलै रोजी दिला. त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जवळपास महिनाभरापासून दिल्लीतील जंतर-मंतर येथे कॉक्रोच जनता पार्टी (सीजेपी) आणि समर्थकांचं आंदोलन सुरू होतं.

पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारला. राष्ट्रपती भवनाने याबाबत अधिकृत निवेदन जारी करत माहिती दिली होती.

तसंच, पंतप्रधानांच्या सल्ल्यानुसार राष्ट्रपतींनी प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला आहे, अशी माहिती या निवेदनाद्वारे देण्यात आली.

प्रल्हाद जोशी हे सध्या ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री असून त्यांच्याकडे नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचाही कार्यभार आहे.

महत्त्वाचं म्हणजे, मोदी सरकारच्या कार्यकाळात पहिल्यांदाच एखाद्या आंदोलनामुळे त्यांच्या एका मंत्र्याला आपलं पद सोडावं लागलेलं आहे.

प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशभरात तरुणाईचा जल्लोष पाहायला मिळाला. सामाजिक, राजकीय, मनोरंजन अशा सर्वच क्षेत्रातून या आंदोलनाच्या यशावर विविध प्रतिक्रिया उमटल्या.

भाजपचे ज्येष्ठ नेते मुरली मनोहर जोशी यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर 'उशिरा का होईना, योग्य निर्णय झाला', अशी प्रतिक्रिया दिली.

'देर आए दुरुस्त आए' – मुरली मनोहर जोशी

मुरली मनोहर जोशी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिले, "उशिरा का होईना, पण योग्य निर्णय झाला. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. मला आशा आहे की पंतप्रधान या प्रकरणी वेळेवर निर्णय घेतील."

पुढे त्यांनी लिहिले, "ज्या सर्व विद्यार्थ्यांनी शांततापूर्ण मार्गाने हे आंदोलन संपवले, त्यांचं मी अभिनंदन करतो. आता भारतीय शिक्षण क्षेत्रात लवकरच शांतता प्रस्थापित होईल आणि विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी व प्रगतीसाठी भरपूर संधी मिळतील, अशी मला आशा आहे."

मुरली मनोहर जोशी हे अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारमध्ये मानव संसाधन विकासमंत्री होते. त्या काळात उच्च शिक्षण विभाग या मंत्रालयाच्या अखत्यारीत होता.

गुरुवारी (23 जुलै) मुरली मनोहर जोशी यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाबाबत चिंता व्यक्त केली होती.

त्यांनी एक्सवर याबाबत लिहिले होते की, "देशाच्या विविध भागांतून आलेले विद्यार्थी गेल्या अनेक दिवसांपासून नवी दिल्लीच्या रस्त्यांवर आंदोलन करत असल्याचे पाहून खूप दुःख होते."

परीक्षा व्यवस्थेबाबत विद्यार्थ्यांची चिंता रास्त असून त्यावर संवेदनशीलतेने तोडगा काढण्याची गरज आहे, असंही ते म्हणाले होते.

अमित शाह धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काय म्हणाले?

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं की, भाजपमध्ये कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश अधिक महत्त्वाचा आहे.

शनिवारी (25 जुलै) उशिरा रात्री त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर लिहिलं की, मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते आणि पेपरफुटीविरोधात आवश्यक सुधारणा करण्यासाठी कटिबद्ध आहे.

अमित शाह यांनी लिहिलं, "भाजप कार्यकर्त्यांसाठी पदापेक्षा देश, आपली तरुण पिढी आणि विद्यार्थी अधिक महत्त्वाचे आहेत. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज दिलेला राजीनामा हेच दर्शवतो."

ते पुढे म्हणाले, "मोदी सरकार देशातील तरुणांच्या भावनांचा आदर करते आणि पेपरफुटीविरोधात आवश्यक सुधारणा करण्यासाठी वचनबद्ध आहे. पेपरफुटीप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा व्हावी यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले निर्णय कौतुकास्पद आहेत. मला पूर्ण विश्वास आहे की, या उपाययोजनांमुळे नीट परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांना निश्चितपणे न्याय मिळेल."

अमित शाह यांनी धर्मेंद्र प्रधान यांच्या कार्यकाळाचाही उल्लेख केला. ते म्हणाले, "राष्ट्रीय शिक्षण धोरणाची प्रभावी अंमलबजावणी, मातृभाषेतून परीक्षांची तरतूद, पीएम श्री शाळांचा विस्तार, डीजिटल शिक्षणाला चालना, कौशल्य विकास तसेच उद्योग आणि शैक्षणिक क्षेत्रातील समन्वय मजबूत करण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांनी महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या.

परीक्षा व्यवस्था अधिक सर्वसमावेशक आणि विद्यार्थीकेंद्रित करण्यासाठी त्यांनी केलेले त्यांचे प्रयत्नही उल्लेखनीय आहेत. विकसित भारताच्या संकल्पनेप्रती त्यांची बांधिलकी त्यांच्या कार्यकाळातून स्पष्टपणे दिसून येते."

बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.